तुळजापूरमध्ये लाचखोर सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!
धाराशिव : दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी, गुन्ह्यात कलमवाढ न करण्यासाठी आणि मोटारसायकल जप्त न करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तुळजापूर पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला (ASI) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. श्रीनिवास रामदास आरदवाड (वय ४८) असे या लाचखोर पोलिसाचे नाव असून बुधवारी (दि. ४) तुळजापूर पोलीस ठाण्याच्या आवारात ही धडक कारवाई करण्यात आली.
काय आहे प्रकरण?
तक्रारदारावर दाखल असलेल्या एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी एएसआय आरदवाड यांनी यापूर्वीच १० हजार रुपये घेतले होते. मात्र, तरीही त्यांनी गुन्ह्यामध्ये अतिरिक्त कलमे न वाढवण्यासाठी आणि गाडी जप्त न करण्यासाठी तक्रारदाराकडे नव्याने १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी तत्काळ धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली.
असा रचला सापळा:
या तक्रारीनुसार एसीबीच्या पथकाने बुधवारी (दि. ४ मार्च) पडताळणी केली. यावेळी आरदवाड यांनी तडजोडीअंती ५ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर लगेचच तुळजापूर पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचण्यात आला आणि तक्रारदाराकडून ५ हजारांची लाच घेताना एएसआय आरदवाड यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
त्यांच्या अंगझडतीमध्ये ५,३०० रुपये रोख, एक विवो कंपनीचा मोबाईल, पोलीस आयडी कार्ड आणि इतर साहित्य मिळून आले आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाई करणारे पथक:
ही यशस्वी कारवाई छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे आणि धाराशिवचे पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांनी काम पाहिले, तर पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय वगरे करत आहेत. या पथकात पोलीस अंमलदार आशिष पाटील, विशाल डोके, जाकेर काझी आणि चालक दत्तात्रय करडे यांचा समावेश होता.
एसीबीचे नागरिकांना आवाहन:
कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीने शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त पैशांची मागणी केल्यास निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भ्रष्टाचारासंदर्भात तक्रार करण्यासाठी संपर्क:
* टोल फ्री क्रमांक: १०६४
* व्हॉट्सॲप क्रमांक: ९२७०२३१०६४
* पोलीस उपअधीक्षक, एसीबी धाराशिव: ९०४९५१९८३३
मुख्य संपादक : दत्ता सुरवसे






