“बुलडोझर बाबा” अडचणीत; अतिक्रमण अधिकारी जगन्नाथ बनसोडेंसह ५ जणांवर स्क्रॅप चोरीचा गुन्हा
महापालिकेच्या स्टोअरमधून दिवसाढवळ्या ‘भंगार गायब’!
शिवसेना नेते अमोल शिंदेंचा धडक प्रवेश; अधिकाऱ्यांसमोरच उघड झाला प्रकार, एफआयआरचे आदेश..
महापालिका प्रतिनिधी /सोलापूर
सोलापूर महापालिकेच्या मुख्यालयामागील स्टोअर विभागात सोमवारी अक्षरशः चित्रपटालाही लाजवेल असा प्रकार घडला. अतिक्रमण विभागाकडून जप्त करण्यात आलेले साहित्य आणि भंगार दिवसाढवळ्या वाहनांमधून बाहेर नेले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (एकनाथ शिंदे गट) गटनेते अमोल शिंदे यांनी करत महापालिकेतील कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या घटनेमुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
महापालिकेच्या स्टोअर विभागात अतिक्रमण कारवाईदरम्यान जप्त केलेले साहित्य तसेच भंगार ठेवण्यात येते. सोमवारी सकाळी एका वाहनातून येथील साहित्य बाहेर नेण्यात आले. विशेष म्हणजे काही वेळाने तेच वाहन पुन्हा स्टोअर विभागात दाखल झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात साहित्य आणि भंगार वाहनात भरले जात असताना अमोल शिंदे अचानक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला.
घटनास्थळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आकुलवार, अविनाश वाघमारे, अतिक्रमण विभागाचे अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांच्यासह पोलीसही दाखल झाले. अमोल शिंदे यांनी अधिकाऱ्यांसमोरच सवालांची सरबत्ती करत, “महापालिकेच्या मालमत्तेची अशी खुलेआम लूट सुरू आहे का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला.
यावेळी स्टोअर विभागातील सीसीटीव्ही फुटेज तातडीने तपासून संपूर्ण प्रकाराचा छडा लावावा, अशी मागणी शिंदे यांनी लावून धरली. अखेर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनीही प्रकार गंभीर असल्याचे मान्य करत संबंधितांवर एफआयआर दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
“एफआयआर करा” म्हणताच शिंदे संतापले
घटनास्थळी झालेल्या चर्चेदरम्यान अतिक्रमण विभागाचे अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांनी, “जर काही चुकीचे होत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून पोलिसांत एफआयआर करा,” असे वक्तव्य केले. हे ऐकताच अमोल शिंदे संतापले. त्यांनी थेट अतिरिक्त आयुक्त कारंजे यांच्याकडे बोट दाखवत, “महापालिकेच्या स्टोअरमधून साहित्य बाहेर जात असताना अधिकारीच जबाबदारी झटकत असतील तर नागरिकांनी कुणावर विश्वास ठेवायचा?” असा सवाल केला.
यावर कारंजे यांनीदेखील स्टोअर विभागातील कार्यपद्धती चुकीची असल्याचे मान्य करत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई आणि एफआयआरचे आदेश दिले.
Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






