देवदर्शनासाठी आलेल्या गाडीला आयशर टेम्पोची जोराची धडक; चौघांचा जागीच मृत्यू
मंगळवेढा शहराजवळ भीषण अपघात होऊन चौघांचा जागीच मृत्यू झाला असून त्यात लहान मुलांचाही समावेश आहे. काही जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना मंगळवेढा–पंढरपूर रोडवरील शरदनगर येथे घडली.
देवदर्शनासाठी पंढरपूरला आलेल्या बाहेरील कुटुंबाच्या क्लोझर गाडीला आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार आयशर टेम्पोचा चालक दारूच्या नशेत वाहन चालवत होता.
अपघाताची माहिती मिळताच डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
विशेष म्हणजे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अवघ्या २४ तासांपूर्वी दारू सेवन करून अवजड वाहन चालवणाऱ्या चालकावर कारवाई केली होती. मात्र पुन्हा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याने हा भीषण अपघात घडून चौघांना आपले प्राण गमवावे लागले.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






