कॉपर वायर चोरी प्रकरणी ३ आरोपींना अटक व मुद्देमाल आणि पिकअप जप्त.
बार्शी :
बार्शी शहरातील परांडा चौक परिसरातील एका वाईंडिंग वर्कशॉपच्या गोदामातून लाखो रुपयांच्या कॉपर वायरची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा बार्शी शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेले बोलेरो पिकअप वाहन असा एकूण ६ लाख ९७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
घटनेचा तपशील
तक्रारदार पप्पू श्रीमंत रगडे (वय ३५, रा. उपळाई ठें., ता. बार्शी) यांचे परांडा चौक, बार्शी येथे वाईंडिंग वर्कशॉपचे गोदाम आहे. दि. १२ मे २०२६ ते १३ जून २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी गोदामाचे शटर उचकटून आतील १ लाख ९३ हजार ६०० रुपये किमतीचे २०४ किलो वजनाचे ५ कॉपर वायरचे बंडल चोरून नेले होते. याप्रकरणी तक्रारदार यांच्या फिर्यादीवरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३६३/२०२६, बीएनएस कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोल्हापूर परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.
#अटक करण्यात आलेले आरोपी
1. सागर आकाराम गोसावी, वय ४७ वर्षे, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर, जि. कोल्हापूर.
2. हनुमंत राजाराम सपोनीसी, वय ४० वर्षे, रा. त्रिवेळी मंदिर, टेंबलाई नाका, कोल्हापूर.
3. दुर्गाप्पा रामाप्पा कल्याणी, वय ४८ वर्षे, रा. त्रिवेळी मंदिर, टेंबलाई नाका, कोल्हापूर.
या गुन्ह्यातील चौथा साथीदार मंजूनाथ (रा. टेंबलाई नाका, कोल्हापूर) हा फरार असून, पोलिस त्याचा तीव्र शोध घेत आहेत.
#जप्त मुद्देमाल
१,९३,६०० रुपये किमतीचे २०४ किलो वजनाचे ५ कॉपर वायर बंडल, ४ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप गाडी (क्र. MH 10 BR 1411)
वायर कापण्याचे कटर व इतर साहित्य, अंदाजे ८,००० रुपये, अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ६ लाख ९७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुढील तपास सुरू
अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी तसेच पुढील तपासासाठी पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर टोळी आंतरजिल्हा अथवा आंतरराज्य गुन्हेगारीशी संबंधित आहे का, तसेच त्यांनी अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत का, याबाबत बार्शी शहर पोलीस तपास करीत आहेत. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलिसांनी केली.






