Success Story: स्टार्टअप सुरू करण्यासाठी २० ते ३० वय योग्य मानले जाते. मात्र, हा समज चेन्नईतील लोकेश्वरन कन्नन यांनी पूर्णपणे मोडीत काढला आहे. आयटी क्षेत्रात तब्बल २८ वर्षांचा भक्कम अनुभव आणि एका बहुराष्ट्रीय कंपनीतील उच्च पदाची नोकरी सोडून त्यांनी वयाच्या ४८व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. 🙏🙏🙏🙏
अनेकांनी त्यांना ‘वेडे’ ठरवले; मात्र ते आपल्य निर्णयावर ठाम राहिले.
फक्त १ लाख रुपये, एक टेबल, एक खुर्ची आणि एक पंखा…अशा अत्यंत मर्यादित साधनांच्या जोरावर डिसेंबर २०१९ मध्ये त्यांनी eOrbitor या कंपनीची स्थापना केली. आज eOrbitor ही केवळ कंपनी नाही, तर डेटा सेंटर मेंटेनन्स, सायबर सिक्युरिटी आणि क्लाउड सेवांमध्ये अग्रगण्य सिस्टम इंटीग्रेटर म्हणून उदयास आली आहे.
लॉकडाऊनमध्ये संधी शोधली
कंपनी सुरू झाल्यानंतर अवघ्या ४० दिवसांतच कोरोना लॉकडाऊन जाहीर झाला. जिथे अनेक प्रस्थापित आयटी कंपन्या अडचणीत सापडल्या, तिथे लोकेश्वरन यांनी या परिस्थितीला संधीमध्ये बदलले. त्यांनी लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक ठरलेल्या डेटा सेंटर मेंटेनन्स सेवांवर लक्ष केंद्रित केले. कंपनीची पहिली ऑर्डर केवळ १४ हजार रुपयांची (फायरवॉल सपोर्ट) होती. मात्र दूरदृष्टी, शिस्त आणि सातत्य यामुळे पुढे मोठ्या करारांची दारे उघडत गेली.
दिग्गजांचा विश्वास संपादन
आज eOrbitor आयटी क्षेत्रातील ‘डॉक्टर’सारखी भूमिका बजावते. मोठ्या प्रकल्पांमध्ये किंवा संस्थांमध्ये डेटा सेंटर क्रॅश झाल्यास, कंपनीची टीम मिनिटांत सेवा पूर्ववत करते. या विश्वासाच्या जोरावर आज Gujarat Metro Rail, Ashok Leyland आणि Zoho यांसारखे नामांकित क्लायंट कंपनीशी जोडले गेले आहेत. eOrbitor केवळ उपकरणे विकत नाही, तर दीर्घकालीन भागीदारी आणि सेवांवर भर देते.
१ लाखातून १५ कोटींचा टर्नओव्हर
१ लाखांपासून सुरू झालेला हा प्रवास आज १५ कोटी रुपयांच्या टर्नओव्हरपर्यंत पोहोचला आहे. पुढील वर्षी हा टर्नओव्हर ३० कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे. लोकेश्वरन यांच्या यशामागील प्रमुख सूत्र म्हणजे आर्थिक शिस्त, वेंडर्सना वेळेवर देयके, कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या १ तारखेला पगार…या विश्वासार्हतेमुळे बँकांनी कोणतीही मालमत्ता तारण न ठेवता कंपनीला ५ कोटी रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली आहे. एमएसएमईसाठी ही मोठी कामगिरी मानली जाते.
११ शहरांनंतर आंतरराष्ट्रीय झेप
आज eOrbitor भारतातील ११ शहरांमध्ये कार्यरत आहे. फेब्रुवारी २०२५ पासून कंपनीने यूएई (शारजाह, दुबई, अबू धाबी) येथेही कामकाज सुरू केले आहे. विस्तारासोबतच लोकेश्वरन कर्मचारी कल्याणालाही प्राधान्य देतात. ५ दिवसांचा कार्यआठवडा आणि कॅशलेस हेल्थ इन्शुरन्स यांसारख्या धोरणांतून त्यांची मानवी दृष्टीही स्पष्ट होते. त्यांच्या मते, यश म्हणजे केवळ नफा नव्हे; तर कंपनीसोबत जोडलेल्या ५० हून अधिक कुटुंबांचे सुरक्षित भविष्य आहे.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






