सोरेगाव परिसरातील मलनिस्सारण-पाणीपुरवठा प्रकल्पांची आयुक्तांकडून पाहणी; तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश
—
सोलापूर – सोलापूर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज सोरेगाव परिसरातील महत्त्वाच्या मलनिस्सारण आणि पाणीपुरवठा संबंधित प्रकल्पांची सविस्तर पाहणी केली. पाहणीत नियोजित सांडपाण्याचे पंप हाऊस, प्रतापनगर मलनिस्सारण केंद्र (STP) आणि प्रतापनगर तलाव परिसराचा समावेश होता.
या वर्षी प्रतापनगर तलाव प्रथमच अतिवृष्टीमुळे पूर्ण क्षमतेने भरला असून तलावातील पाण्यामुळे मलनिस्सारण केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य पाईपलाईनचे चेंबर जलमग्न झाले आहे. त्यामुळे केंद्राकडे येणाऱ्या पाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले असून प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत.
पाहणीदरम्यान आयुक्तांनी अशा परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ट्रंक लाईनच्या चेंबरची उंची वाढवणे, केंद्रात येणारे पाणी बायपास होणार नाही याची काटेकोर दक्षता घेणे, तसेच तातडीच्या दुरुस्त्या करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
नर्मिती मंगल कार्यालयाजवळील नाला आणि तिथल्या अतिक्रमणाचेही तातडीने निर्मूलन करण्याचे आदेश दिले.
झोन क्रमांक ५ मधील कल्याण नगर भाग-३ येथील सार्वजनिक नळांची प्रत्यक्ष पाहणी करून झोननिहाय सर्वेक्षणाचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितले.
या पाहणीदरम्यान सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चोबे, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, सहायक अभियंता रामचंद्र पेंटर, विभागीय अधिकारी तळीखेडे, राहुल शिंदे, लक्ष्मी इंजिनिअरिंगचे प्रतिनिधी अनिकेत जोशी, वेपकॉस कन्सल्टंटचे अनिल जाधव, शेफाली दिलपाक आदी उपस्थित होते.
शहरातील मलनिस्सारण व्यवस्था अधिक मजबूत आणि कार्यक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना वेगात राबविण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






