सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज आंवती नगर परिसरातील नाले व संबंधित भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित विभागीय अधिकारी,कन्सल्टंट तसेच टी. पी. यांना आवश्यक त्या सूचना दिल्य.
आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी आंवती नगर येथील नाला, ६ कमान तसेच १४ कमान या भागातील प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला. पाहणी दरम्यान त्यांनी नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण तातडीने करण्याचे निर्देश दिले. विशेषत: ६ कमान परिसरात अलाइनमेंट प्रमाणे २० ते २५ मीटर रुंदी ठेवून सदर नाला अदिला नदीला जोडण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
तसेच शेळगी नाल्याचे आंवती नगर पासून ६ कमान मार्गे अदिला नदीपर्यंत संपूर्ण रुंदीकरण व खोलीकरण करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. यासाठी प्रत्यक्ष जागेवर मोजमाप (survey) करून सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश विभागीय अधिकारी, कन्सल्टंट आणि टी. पी. यांना देण्यात आले.
सदर कामे झाल्यानंतर शहरातील पावसाळी पाणी नाल्याद्वारे सुटसुटीतपणे वाहून जाईल, तसेच नागरिकांना साचलेल्या पाण्याचा त्रास होणार नाही, यावरही त्यांनी भर दिला.
सोलापूर महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या सोयीसाठी व शहरातील पावसाळी पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा या दृष्टीने सातत्याने उपाययोजना करीत असल्याचे आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी सांगितले.यावेळी उपायुक्त आशिष लोकरे,नगर अभियंता सारिका आकूलवार, विभागीय अधिकारी उपस्थिती होते.