पत्रकार संरक्षण कायदा तातडीने लागू करा – पत्रकारांची सरकारकडे मागणी
बार्शी (प्रतिनिधी) :
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने संपूर्ण पत्रकार समाजात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बार्शी शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने बार्शी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या पत्रकारांवर गावगुंडांनी अमानुषपणे हल्ला केला. या हल्ल्यात झी 24 तासचे योगेश खरे, साम टीव्हीचे अभिजीत सोनवणे आणि पुढारी न्यूजचे किरण ताजणे गंभीर जखमी झाले. पत्रकारांवरचा हा जीवघेणा हल्ला म्हणजे थेट लोकशाहीच्या किल्ल्यावरच प्रहार असल्याचा आरोप पत्रकारांनी केला.
जनतेचा आवाज बुलंद करणाऱ्या पत्रकारांवर हात उचलणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणे होय. या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार बांधवांनी प्रशासनाकडे केली.
यावेळी पत्रकारांनी ठामपणे सांगितले की – “पत्रकार संरक्षण कायदा कडक अंमलात आला नाही, तर लोकशाहीचा चौथा स्तंभ असुरक्षित राहील आणि लोकशाही धोक्यात येईल.” त्यामुळे सरकारने पत्रकार संरक्षण कायदा तातडीने लागू करावा तसेच पत्रकारांना शासकीय स्तरावर सुरक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देताना बार्शी शहर व तालुक्यातील दैनिक, साप्ताहिक, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया तसेच व्हाईस ऑफ मीडियाचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.