महापालिकेच्या स्वच्छ सोलापूर मोहिमेला बँक ऑफ महाराष्ट्रचा हातभार; मनपाच्या ताफ्यात तीन नवीन घंटागाड्या दाखल
बातमी:
सोलापूर शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने सामाजिक बांधिलकीतून महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. बँकेच्या CSR निधीतून सोलापूर महानगरपालिकेला तीन नवीन घंटागाड्या देण्यात आल्या असून, त्यांचे लोकार्पण आयुक्त डॉ. सचिन ओम्बेसे यांच्या हस्ते सोमवार, २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले.
श्रीफळ फोडून व फित कापून या वाहनांचे पूजन करण्यात आले. या उपक्रमामुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक गतिमान होणार असून स्वच्छ सोलापूरच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर संजीव कुमार, डेप्युटी झोनल मॅनेजर सुजित कुमार झा, मुख्य व्यवस्थापक राहुल डोंगरे यांच्यासह बँकेचे अधिकारी उपस्थित होते. तसेच सायप्रो एंटरप्राइजेसचे अमोल वालेकर व अनंत महामुनी यांचीही विशेष उपस्थिती होती.
अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात स्वच्छतेसाठी विविध अभिनव उपक्रम राबविले जात असून, या नवीन घंटागाड्यांमुळे कचरा संकलनाची क्षमता वाढून नागरिकांचे आरोग्य अधिक सुरक्षित राहण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागातील नागनाथ बिराजदार, अनिल चराटे व नागेश मेंडगुळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






