काल अनगर नगरपंचायतीच्या १७ नगरसेवकांसह १ नगराध्यक्ष बिनविरोध झाला आणि त्या जल्लोषात भाजपचे युवा नेते बाळराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून “कोणाचाही नाद करा, पण अनगरकरांचा करू नका” असं एक वाक्य बोललं आणि राज्यातल्या सगळ्या अजित पवार समर्थकांनी त्यावर तुटून पडत टीका सुरू केल्या, मात्र राष्ट्रवादीने आमदार रोहित पवार यांनी आज बाळराजे पाटील याच्यावर टीका करताना भाजपची संस्कृती, मतचोरी आणि संस्कार असे बरेच ज्ञानाचे धडे दिले. मुळात रोहित पवार हेच विसरले की आपण स्वतः १२०० मतांनी पोस्टल मतांवर निवडून आलो आहोत, जर भाजपने मतचोरी केली असती तर आज आजोबांसह आपल्याला पेटी वाजवत बसावं लागलं असतं. एक नगरपंचायत बिनविरोध होऊ नये म्हणून केलेल्या कारस्थानावर बाळराजे पाटील यांनी एक स्टेटमेंट दिलं तर त्यात गैर काय मला कळलं नाही. जी माणसं एख्खी नगरपंचायत बिनविरोध करू शकतात त्यांनी एकही वाक्य बोलू नये ? आणि जो तुमचा जिल्हाचा नेता स्वतःच्या शहरात, तालुक्यात ३७ नगरसेवक उमेदवारांपैकी आणि २ नगराध्यक्षापैकी साधा एकही उमेदवार घड्याळाचा उभा करू शकत नाही त्यांनी कितीही बोललं तरी चालतं हे कसं शक्य आहे ! मुळात यात मी जास्त बोलणारही नाही.
मात्र रोहित पवार तुम्ही भाजपचे संस्कार आणि संस्कृती काढताना आपल्या आजोबांची काही भाषणं काढली असती, आपल्या स्वतःची काही भाषणं काढली असती, आपल्या उपस्थितीत झालेली काही भाषणं काढून बघितली असती आणि जास्त जुनं तर नाही पण परवा परवा ईश्वरपूरला झालेलं महाराष्ट्र बचावचं आंदोलन आणि त्यात आपल्या उपस्थितीत झालेली भाषणं आठवली असती तर इतका थयथयाट झालाच नसता. कारण आपले संस्कार आठवले असते.
भाजपसाठी अनगर नगरपंचायत ही विजयी सुरुवात झाली, सोलापूर जिल्हा परिषद व्हाया बाजार समिती, जिल्हा बँक आणि इतर सहकारातल्या सर्व निवडणुका, त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेतील विधानपरिषद हा शेवट होणार ! हे सगळं विजयी झालेलं पहायचं आहे आणि हे सगळं फक्त तुम्हालाच नाही, अजित दादानाही बघावं लागणार आहे.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






