सोलापूरकरांनी जाणून घेतला भुईकोट किल्ला!
—
इको फ्रेंडली क्लबकडून पर्यटन दिनाच्या निमित्ताने भटकंती
—
सोलापूर : सोलापुरात अनेक वर्ष राहून सुद्धा आम्ही कधीच भुईकोट किल्ला पाहिला नव्हता! आज आम्ही फक्त किल्ला पाहिला नाही तर तो जाणूनही घेतला.. अशा बोलक्या प्रतिक्रिया पर्यटनप्रेमी सोलापूरकरांनी व्यक्त केल्या. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटनप्रेमी सोलापूरकरांनी रविवारी सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात भटकंती करून इतिहास जाणून घेतला.
निसर्ग पर्यटनासाठी प्रयत्नशील असलेल्या इको फ्रेंडली क्लबने भारतीय पुरातत्त्व विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली भुईकोट किल्ला भटकंतीचा उपक्रम आयोजित केला होता. पर्यटन दिनानिमित्त पर्यटन आणि शाश्वत परिवर्तन हा संदेश देणाऱ्या भुईकोट किल्ला भटकंतीला पर्यटनप्रेमी सोलापूरकरांनी प्रतिसाद दिला. इतिहास अभ्यासक, लेखक नितीन अणवेकर यांनी भुईकोट किल्ल्याच्या संदर्भात अभ्यासपूर्ण माहिती सांगितली. या उपक्रमात अनेकजण आपल्या लहान मुलांसह सहभागी झाले होते.
दिंडी दरवाजा, हत्ती दरवाजा, शहर दरवाजा, बुरुज, 32 खांबी वास्तु, मुंजा बाबा मंदिर, कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर, नागबावडी विहीर, पद्मावती देवी मंदिर, खंदक, तोफा, विरगळ यासह विविध शिल्पांची माहिती इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांनी दिली.
अनेक दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली.. सोलापूरचा भुईकोट किल्ला जवळून अनुभवता आला.. मुंजाबाबा आणि पद्मावती देवी यांच्याविषयी माहिती मिळाली, इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांनी भुईकोट किल्ल्याची छान माहिती दिली अशा प्रतिक्रिया उपस्थित पर्यटनप्रेमी सोलापूरकरांनी व्यक्त केल्या.
‘आपल्या शहराचा आणि भुईकोट किल्ल्याचा इतिहास खूपच रंजक आहे. सोलापुरात येणाऱ्या मित्र आणि नातेवाईकांना भुईकोट किल्ला प्रत्येकाने दाखवायला हवा. तुम्ही तुमच्या वाढदिवसाला भुईकोट किल्ला भ्रमंतीचा उपक्रम राबवू शकता’, असे आवाहन इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांनी केले.
प्रारंभी इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे यांनी सर्वांचे स्वागत केले. महिन्यातून, आठवड्यातून थोडासा वेळ काढून प्रत्येकाने आपल्या शहरातील, जिल्ह्यातील वारसास्थळे, निसर्ग पर्यटन स्थळ पाहायला हवीत. सर्वांनी सोलापूरच्या पर्यटन विकासासाठी पुढे यावे असे आवाहन श्री. कोकणे यांनी केले. याप्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुरी, इको फ्रेंडली क्लबचे समन्वयक अजित कोकणे, इको फ्रेंडली क्लबचे सदस्य संजय टोळे, मकरंद काडगावकर, मेघा क्षीरसागर, धनंजय कांबळे, सुनील थिटे, राजेंद्र जमादार, सनी पाटील, सचिन कांबळे, महावीर लाळे, रोहित बलसुरे, सुदन सुरवसे, शब्बीर सय्यद, संगमनाथ नागोजी, वैष्णवी होले-पाटील, शांतेश करजगी, ॲड. चंद्रसेन गायकवाड, दीपक कंदलगावकर, राजेंद्र गानमोटे, कृष्णा माळवेकर, योगिता चाबुकस्वार, भिमगोंडा पाटील, नरेश मादगुंडी, जनार्धन येमूल, स्नेहा सिरसागर, डॉ. एकता कुलकर्णी, अर्चना जमादार, रविकांत प्याटा यांच्यासह अनेक सोलापूरकर उपस्थित होते.
ही भटकंती यशस्वी करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी महादेव कांबळे यांचे सहकार्य, मार्गदर्शन लाभले.
सोलापूर विभाग प्रतिनिधी : राजन क्षत्रिय
#ecofriendlyclub #WorldTourismDay #WorldTourismDay2025 #maharashtratourism #mtdc #solapur #solapurtourism #bhuikotfort #solapurfort #tourism #RethinkingTourism #heritagewalk