🚰 “रात्री पाणी सुरळीत द्या, जुन्या लाईन तात्काळ बदला” – आमदार देशमुखांचा प्रशासनाला कडक इशारा
सोलापूर | प्रतिनिधी
Solapur शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर विभागीय कार्यालय क्र. ५ येथे झालेल्या आढावा बैठकीत आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका प्रशासनाला स्पष्ट आणि ठोस निर्देश दिले. ३० ते ३५ वर्षांपासून जुनी झालेली ड्रेनेज लाईन आणि पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन तातडीने बदलण्याची प्रक्रिया वेगाने राबवावी, तसेच रात्रीचा पाणीपुरवठा नियमित व सुरळीत करावा, असे त्यांनी बजावले.
⚠️ धोकादायक ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती तातडीने..
आर.टी.ओ. रोड, माशाळ नगर, दाते नगर, निलम नगर आदी भागांमध्ये ड्रेनेज चेंबरची पातळी बिघडल्याने अपघात होत असल्याचे निदर्शनास आणून देत तातडीच्या दुरुस्तीचे आदेश देण्यात आले. “रस्ता आणि ड्रेनेज हे प्रयोगशाळा नाहीत,” असा स्पष्ट संदेश प्रशासनाला देण्यात आला.
💡 स्वच्छता, एलईडी व पावसाळी नियोजनावर भर
शहरातील रस्ते स्वच्छता, एलईडी लाईट बसविणे, नगरोत्थान योजनेतील ड्रेनेज कामे आणि पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या भागांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
🏥 100 बेड प्रसूतीगृह व तलाव सुशोभीकरण
निलम नगर येथे १०० बेडचे महिला प्रसूतीगृह सुरू करण्याचा प्रस्ताव, छत्रपती संभाजी महाराज तलावाचे सुशोभीकरण, हद्दवाढ भागात भाजीमंडई उभारणी आणि प्रतापनगर तांडा येथे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
🏢 विभागीय कार्यालय जुळे सोलापुरात?
विभागीय क्र. ५ चे कार्यालय जुळे सोलापूर येथे स्थलांतरित करून नागरिकांना अधिक सुलभ सेवा द्याव्यात, अशीही सूचना करण्यात आली. मूलभूत सुविधांबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका बैठकीत मांडण्यात आली.
बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, सहाय्यक आयुक्त आशिष लोकरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुख्य संपादक : दत्ता सुरवसे






