सोलापूर सायबर पोलिसांची मोठी कारवाई…
3 वर्षांपासून फरार मुख्य सूत्रधार अखेर जेरबंद…
सोलापूर: ऑनलाइन फसवणुकीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत सोलापूर शहर सायबर पोलिसांनी तीन वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे.ग्लेन (अल्बर्ट) पर्सी सिक्वेरा याला सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबाद येथे लुकआउट नोटीसच्या आधारे ताब्यात घेण्यात आले.
लाओसमधून चालवत होता फसवणुकीचे जाळे
आरोपी गेल्या काही वर्षांपासून लाओस देशात वास्तव्यास होता. तेथून चायनीज व मलेशियन साथीदारांच्या मदतीने भारतातील नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात ओढले जात होते. शेअर मार्केटमध्ये 10 ते 300 टक्के नफ्याचे आमिष दाखवून तब्बल 62 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
डिजिटल करन्सीद्वारे परदेशात पैशांचा ट्रान्सफर
फसवणुकीतून उकळलेली रक्कम डिजिटल करन्सी (USDT) वॉलेटच्या माध्यमातून परदेशात ट्रान्सफर करण्यात आली. तसेच AL HAREEM HAJIJ UMRAH SERVICES आणि BLACKSEED SOLUTIONS या खात्यांचा वापर व्यवहारांसाठी करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
युवकांना नोकरीचे आमिष; पासपोर्ट जप्त
आरोपी लाओसमध्ये युवकांना परदेशात उच्च पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवत असे. त्यानंतर त्यांचे पासपोर्ट जप्त करून त्यांच्याकडूनच ऑनलाइन फसवणूक करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
देशभरात 92 तक्रारी
आरोपीविरुद्ध देशातील विविध राज्यांत तब्बल 92 ऑनलाइन तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. सोलापूर शहर सायबर पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात एकूण 8 आरोपी निष्पन्न केले असून इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, न्यायालयाने आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून सोलापूर शहर सायबर पोलिसांकडून तपासाला वेग देण्यात आला आहे. या कारवाईमुळे ऑनलाइन गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






