सोलापूरच्या अर्थकारणाला चालना देणारे ‘इलेक्ट्रो 2026’ प्रदर्शन थाटात उद्घाटन
– आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांचे प्रतिपादन
सोलापूर, दि. 12 :
इलेक्ट्रो प्रदर्शन हे सोलापूरच्या अर्थकारणाला पाठिंबा देणारे व्यासपीठ असून शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी केले. इलेक्ट्रो प्रदर्शनातून दरवर्षी सुमारे 50 कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशनतर्फे इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर्स, टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलर व फिटनेस इक्विपमेंट्सचे भव्य ‘इलेक्ट्रो 2026’ प्रदर्शन होम मैदानावर दि. 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन व्ही प्लस कंपनीचे सीईओ श्री. संदीप पाटील यांच्या हस्ते व महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी बोलताना श्री. संदीप पाटील यांनी व्ही प्लस कंपनीचे लाँचिंग सोलापुरात होत असल्याचा आनंद व्यक्त केला. भारतीय बनावटीच्या उत्पादनांद्वारे नवीन तंत्रज्ञान व नावीन्यपूर्ण उत्पादने ग्राहकांना देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष श्री. सुरजरतन धुत यांनी प्रास्ताविकात सांगितले की, इलेक्ट्रो प्रदर्शनाचे हे 26 वे वर्ष असून 25 वर्षांपूर्वी 27 स्टॉल्सपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनात आज जवळपास 300 स्टॉल्स सहभागी झाले आहेत. यंदा एक लाखांहून अधिक नागरिक प्रदर्शनाला भेट देतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक व्ही प्लस असून वीझी टीव्ही, हाईफा इलेक्ट्रिकल, अपार इलेक्ट्रिकल्स, लक्ष्मी ऑटोमोबाइल्स, एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी, बजाज फायनान्स व सॅटीसफाय मीडिया हे सहप्रायोजक आहेत.
प्रदर्शनात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे एलसीडी टीव्ही, फ्रिज, साइड-बाय-साइड फ्रिज, एअर कंडिशनर, म्युझिक सिस्टीम, वॉशिंग मशीन, डिश टीव्ही, मायक्रोवेव्ह ओव्हन, व्हॅक्यूम क्लिनर, सोलर सिस्टीम, गॅस गिझर, मोबाईल, आयपॅड, टेलिफोन, हेल्थ इक्विपमेंट, कॉम्प्युटर आदी उत्पादने उपलब्ध आहेत.
7 दिवस चालणारे हे प्रदर्शन दररोज दुपारी 4 ते रात्री 9.30 व रविवारी सकाळी 11 ते रात्री 9.30 पर्यंत खुले राहणार आहे. खरेदीदारांसाठी दररोज लकी ड्रॉ व शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. काही स्टॉल्स सामाजिक संस्थांना विनामूल्य देण्यात आले असून दररोज रक्तदान शिबिर व अवयवदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच ‘रिल्स’ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे, व्ही प्लस कंपनीचे सुशील कुमार देशमुख, प्रफुल्ल देशमुख तसेच सुमित रामाणी, अतिफ खान, पराग पाटील आदींचा सत्कार करण्यात आला.
सचिव हरीष कुकरेजा यांनी स्वागत केले, तर उपाध्यक्ष भूषण भुतडा यांनी आभार मानले. सूत्रसंचालन साक्षी हौदे यांनी केले. कार्यक्रमास असोसिएशनचे पदाधिकारी, माजी अध्यक्ष व संचालक मंडळातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : दत्ता सुरवसे






