spot_img
spot_img
spot_img
spot_img

बारामतीच्या गदिमा सभागृह येथे संपन्न झालेल्या विद्या प्रतिष्ठानचे ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ या नूतन वास्तूच्या उद्घाटन समारंभात उपस्थितांशी सुसंवाद साधला.

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, व्यासपीठावरील सगळे मान्यवर, ज्यांचे विचार आपण आता ऐकले ते श्री. गौतम अदानी, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रीती अदानी आणि उपस्थित बंधू-भगिनींनो..

 

आज एका नाविन्यपूर्ण प्रकल्पाची सुरुवात आपण करत आहोत. बारामतीमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ ही देशातली पहिली अशासकीय ‘नवतंत्रज्ञान केंद्र’ येथे साकारली जात आहे. अनेक नवतंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ आपण बारामतीमधून उभी केली. पण मला आनंद आहे की, आज जो प्रकल्प सुरू होतोय आणि त्याच्या उद्घाटनासाठी श्री. गौतम अदानी या ठिकाणी आहेत; याचा मला मनापासून आनंद आहे.

 

गौतम अदानी देशाच्या उद्योग क्षेत्रातील एक महत्वाचं नाव आहे. अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचं योगदान आहे. पण वैशिष्ट्य हे आहे की, त्यांनी सगळ्याची सुरुवात ही शून्यातून केली. मला आठवतंय की, एक काळ असा होता गुजरातमध्ये काही उभं करावं ही इच्छा होती, पण मर्यादा होत्या. म्हणून गुजरातमधून गौतमभाई हे मुंबईला आले. त्यांचा जिल्हा ‘बनासकाठा’ हा एकेकाळचा दुष्काळी जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये ‘पालनपूर’ हे गाव! त्या ठिकाणी पुढे जायला मर्यादा आहेत, हे लक्षात आल्यानंतर ते मुंबईला आले. खिशामध्ये काहीही नव्हतं, शिक्षण फार नव्हतं. पण मुंबईमध्ये वैशिष्ट्य हे आहे की, मुंबई नगरी जो कुणी कष्ट करतो त्याला कधी उपाशी ठेवत नाही आणि त्याचा फायदा गौतमभाईंनी घेतला, कष्ट केले. काहीतरी उभं करायचं त्यांनी ठरवलं, ही जिद्द त्यांच्यात होती आणि शून्यातून उभं करायचं! आज जर आपण बघितलं तर देशाच्या २३ राज्यांमध्ये ‘अदानी ग्रुप’ हा त्यांचा व्यवसाय आहे, लाखो हातांना त्यांनी काम दिलेलं आहे. आता जे प्रकल्प ते हातात घेतायत, त्यातून आणखी काही लाख मुलांना काम करण्याचा अधिकार मिळेल; याची मला पूर्ण खात्री आहे. नेहमी काहीतरी नवीन करावं, ही त्यांची इच्छा असते.

 

उद्योग उभा करता येतो. पण उद्योग हा कायम चालेल, लोकांना फायद्याचा होईल, असा असला पाहिजे. असे उद्योग त्याला म्हणतात ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ हे कधी थांबत नाही. आज या देशाचा नकाशा तुम्ही बघितला तर सर्व बाजूंनी बंदरं आहेत. मुंबईचं बंदर, खाली कारवारचं बंदर, गोव्याचं बंदर, कर्नाटकाचं बंदर, तामिळनाडूचं बंदर, ओडिशाचं बंदर, पश्चिम बंगाल मधलं बंदर. एकदा बंदर उभं राहिलं की, समुद्रातील दळणवळण हे सुरू होतात. काही ना काहीतरी काम हातांना हे मिळत असतात. गौतमभाईंनी या देशामध्ये बंदरं उभी केली.

 

दुसरं काम त्यांनी केलं प्रवास! देशात हजारो लोक रोज प्रवास या ना त्या मार्गाने करत असतात. प्रवास करायचा आधुनिक साधन विमानतळ याची आवश्यकता ही असते. आज या देशात निम्मे विमानतळ त्यांच्याकडे आहेत. त्या विमानतळांवरून लाखो लोक दर दिवशी प्रवास करत असतात. हा एक मोठा व्यवसाय त्या ठिकाणी झालेला आहे. तिसरी महत्वाची गोष्ट वीज! ती वीज तयार करणे याची आवश्यकता आहे. काही लाख एकर जमीन पडीक होती. ती सौराष्ट्रातील, ती राजस्थानची ही त्यांनी घेतली. त्या ठिकाणी सोलर याच्या माध्यमातून वीज तयार करणं हा मोठा उपक्रम त्यांनी राबवला. असे अनेक उद्योग जे कायम समाजाच्या हिताचे आहेत, आज त्यांनी या देशात उभे केलेले आहेत. त्यामुळे आम्ही आग्रहाने त्यांना या ठिकाणी बोलावलं. जी व्यक्ती शून्यातून इथपर्यंत जाऊ शकते, अशा व्यक्तीचं कर्तृत्व हे नव्या पिढीला समजावं आणि त्यासाठीच आज प्रामुख्यानं विद्यार्थ्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळावी म्हणून आज या ठिकाणी गौतमभाई आणि प्रीतीबेन यांना आम्ही लोकांनी निमंत्रित केलं. ते या ठिकाणी आले, त्यांचे विचार मांडले. उद्याचा भारत कसा असावा? यासाठी त्यांनी त्यांच्या कल्पना या ठिकाणी सांगितल्या. माझी खात्री आहे की, त्या विचारांनी आपण पुढे गेलो तर या देशाची बेकारी, गरिबी घालवण्यात आपल्याला यश मिळेल; याची मला पूर्ण खात्री आहे. म्हणून ते अगत्याने या ठिकाणी आले, त्याबद्दल मी त्यांना अंत:करणापासून धन्यवाद देऊ इच्छितो.

 

आताच त्यांनी एक गोष्ट सांगितली की, डेटा सेंटर! यामुळे हजारो तरुणांना रोजगार मिळेल, ते डेटा सेंटर ते उभे करत आहेत. मला माहिती नाही, नव्या मुंबई मधून त्या दृष्टीने त्यांचं काही काम चालू आहे. त्यातलं काही काम या भागाकडून शक्य असेल तर त्यासाठी लागणारी जी काही सुविधा आहे ते अजित पवार आणि बाकीचे सहकारी त्यांना मनापासून देतील. त्यातला एखादा प्रकल्प या भागात आला आणि या भागातल्या तरुण मुलांच्या हाताला काम मिळालं तर मी खात्रीने सांगतो कि, हा प्रकल्प यशस्वी होईल आणि त्याचा विचार गौतमभाईंनी करावा; एवढीच आग्रहाची सूचना या ठिकाणी मी करतो आणि त्यांचे आपल्या सगळ्यांचे आभार मानतो.

 

आज या कार्यक्रमाला इथे येत असताना आताच मला स्टेजवर एक पाकीट आलं. त्या पाकिटामध्ये काही होतं. ते पाहिलं मी, काय आहे? कसलं पाकीट, कुणी पाठवलं? नंतर सांगण्यात आलं समोर विजय शिर्के हे बसलेत. विजय शिर्केंनी त्या पाकिटात या नव्या कार्यक्रमाला मदत करण्यासाठी अडीच कोटी रुपयांचा चेक या ठिकाणी पाठवला. त्यांचं मी अंत:करणापासून आभार मानतो. तुम्ही दिलेला पै अन पै मी इथल्या तरुण पिढीला उभं करण्याच्यासाठी जे नवीन प्रकल्प आहेत, त्याच्यासाठी खर्च केला जाईल, हे या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत!

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Previous article
Next article

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!