बार्शी पोलिसांची मोठी कामगिरी : ‘ओटीपी’ सायबर फसवणुकीतील आरोपी दिल्लीत अटकेत, शिक्षकाला परत मिळाले १.९८ लाख
बार्शी | प्रतिनिधी
सायबर गुन्हेगारांचे जाळे देशभर पसरलेले असतानाही बार्शी शहर पोलिसांनी चिकाटी, कौशल्य आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर तब्बल दोन वर्षांपूर्वी घडलेल्या ‘ओटीपी’ फसवणुकीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावला आहे. या कारवाईत दिल्ली येथून आरोपीस अटक करत फसवणूक झालेली १ लाख ९८ हजार २०८ रुपये रक्कम फिर्यादी शिक्षकाला परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रकरणातील फिर्यादी महादेव विठ्ठल मिरगणे (वय ५३) हे बार्शीतील शिक्षक असून, १२ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. फोन करणाऱ्याने स्वतःला क्रेडिट कार्ड विभागातील कर्मचारी असल्याचे भासवत, कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने मिरगणे यांच्याकडून वैयक्तिक माहिती व मोबाईलवर आलेला ओटीपी घेतला. काही क्षणातच त्यांच्या खात्यातून १,९८,२०८ रुपये परस्पर काढण्यात आले.
याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. सुरुवातीला तपासाला गती मिळाली नसली तरी, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर या सायबर फसवणुकीच्या प्रकरणाकडे विशेष लक्ष दिले. त्यांनी हा गुन्हा बार्शी शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करून तपासासाठी स्पष्ट सूचना दिल्या.
तपासात आरोपी दिल्ली येथील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक दिल्लीला पाठवण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारे नरेश महेशचंद शर्मा (वय ४५, रा. उत्तर दिल्ली) याला दिल्लीतील सदर बाजार परिसरातून ताब्यात घेण्यात आले. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला बार्शीत आणल्यानंतर, पोलिसांच्या प्रभावी कारवाईमुळे आरोपीने फसवणूक केलेली संपूर्ण रक्कम फिर्यादीला परत दिली. तब्बल दोन वर्षांनंतर आपली कष्टाची कमाई परत मिळाल्याने शिक्षक मिरगणे यांनी बार्शी पोलिसांचे मनापासून आभार मानले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे आणि त्यांच्या पथकाने केली.
दरम्यान, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करताना सांगितले की, बँक, क्रेडिट कार्ड किंवा कोणत्याही विभागातून बोलत असल्याचे सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. एटीएम, क्रेडिट कार्ड, आधारची माहिती तसेच मोबाईलवर आलेला ओटीपी कोणालाही देऊ नये. सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तात्काळ १९३० हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






