करमाळा: ग्रामीण भागातील जिद्द आणि कष्टाच्या जोरावर करमाळा तालुक्यातील वरकुटे मुर्तीचे येथील खेळाडूंनी राज्याच्या क्रीडा क्षितिजावर आपली मोहोर उमटवली आहे. अमरावती येथे नुकत्याच संपन्न झालेल्या शालेय राज्यस्तरीय कंपाउंड आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धेत वैष्णवी पाटील आणि जयहिंद जगताप या दोन्ही खेळाडूंनी आपल्या अचूक निशाण्याने सुवर्णपदकांची कमाई केली असून, त्यांची आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण असून या ग्रामीण खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वरकुटे मुर्तीचे गावची कन्या वैष्णवी पाटील हिने १९ वर्षाखालील वयोगटात खेळताना अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन केले. तिने या स्पर्धेत तब्बल चार सुवर्णपदके पटकावून निर्विवाद वर्चस्व गाजवले. विशेष म्हणजे, या देदीप्यमान यशामुळे वैष्णवीची सलग चौथ्यांदा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वैष्णवी सध्या कोल्हापूर विभागातून प्रतिनिधित्व करत असून सातारा येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत आहे. सातारा येथील ‘दृष्टी आर्चरी अकॅडमी’मध्ये नामांकित प्रशिक्षक प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ती सरावाचे धडे गिरवत असून, आता ती मणिपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाली आहे.
दुसरीकडे, १७ वर्षाखालील वयोगटात जयहिंद जगताप याने देखील आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदक पटकावले. जयहिंदने गेल्या वर्षीही राष्ट्रीय स्पर्धेत आपले वर्चस्व राखले होते आणि यंदाही त्याने सातत्य टिकवत राष्ट्रीय स्पर्धेतील आपले स्थान पक्के केले आहे. जयहिंद सध्या वाशिंबे येथील अभिनव माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असून, तो रांची (झारखंड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या या ग्रामीण खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरापर्यंत मारलेली ही झेप आगामी काळातील खेळाडूंसाठी मोठी प्रेरणा ठरणार आहे.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






