कोकण रेल्वेचा प्रवास हा फक्त रेल्वे मार्ग उभा राहण्याचा इतिहास नाही, तर असामान्य धाडस, कणखर इच्छाशक्ती आणि अफलातून इंजिनिअरिंगची कमाल आहे. कधी काळी मुंबईहून कोकण किंवा मंगलोरला जायचं म्हटलं की लोकांनी एकच मार्ग—कठीण, वळणावळणाचा बाय रोड. कोकणातील लोकांचा एकच प्रश्न—“सगळीकडे रेल्वे आली, पण आगगाडी आपल्या कोकणात कधी धावणार?”
१९९३ पर्यंत किनारपट्टीवरील लोकांसाठी मुंबई–मंगलोर डायरेक्ट रेल्वेची सोयच नव्हती. पण २६ जानेवारी १९९८… प्रजासत्ताक दिनाच्या त्या सकाळी इतिहास घडला. आठ वर्षांच्या घामात भिजलेल्या प्रयत्नांना फळ आलं आणि पहिली कोकण रेल्वे निसर्गरम्य घाटातून धावत लोकांची स्वप्नं प्रत्यक्षात उतरली.
कोकण रेल्वेची कल्पना सुरुवातीला अशक्य वाटत होती. इंग्रजांनी प्रयत्न केला पण मागे हटले—कारण हा मार्ग म्हणजे पर्वत, खोल दऱ्या, असंख्य नद्या आणि भयानक मान्सून! पण नाथ पै, मधु दंडवते आणि खास करून जॉर्ज फर्नांडिस यांनी ही कल्पना पुन्हा जिवंत केली. जॉर्ज फर्नांडिस यांनीच ई. श्रीधरन यांना संपर्क करून प्रोजेक्टचे नेतृत्व दिले—आणि इथूनच ‘अशक्य’ शक्य करण्याचा प्रवास सुरू झाला.
एकूण ९१ बोगदे, जवळपास २००० पूल, ४८५० हेक्टर जमीन आणि ४२,००० भूधारक—ह्या सर्वांचा समन्वय म्हणजेच चमत्कार. पश्चिम घाटाचा खडकाळ भूभाग, खोल दऱ्यांवर पूल, दलदली, वादळी पाऊस, दरडी, बुजलेले बोगदे… आणि तरीही काम थांबलं नाही. काही बोगदे मशीनने शक्यच नसल्यामुळे अक्षरशः हाताने एक-एक मीटर खणावे लागले. १९ कामगारांचा मृत्यू, शेकडो जखमी—पण टीम मागे हटली नाही.
१९९४ च्या महाड पूरात तर उक्षी भागातील संपूर्ण कामच दरडीखाली गेले. इंजिनियर कपूर छातीपर्यंत गाडले गेले, पण जयशंकरन यांनी त्यांना वाचवले—त्यासाठी त्यांना शौर्य पुरस्कार मिळाला. अशी कितीतरी धाडसी कथांनी कोकण रेल्वे आकार घेत गेली.
या प्रोजेक्टची आणखी एक कमाल—सरकारी तिजोरीला हातही न लावता महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि रेल्वे यांनी मिळून भांडवल उभं केलं. ४२,००० लोकांनी जमिन दिली—काहींनी तर मोबदल्याची अपेक्षाही ठेवली नाही.
कारबुडेचा ५.६ किमीचा त्या काळातील भारतातील सर्वात लांब बोगदा, ४२४ पूल, पानवल नदीवरील ६ खांब कुतुब मिनारपेक्षाही उंच असलेला पूल—ही सर्व इंजिनिअरिंगची जिवंत उदाहरणं आजही आपल्याला थक्क करतात.
आणि आज… रोज ७३८ किमीचा हा मार्ग महाराष्ट्र–गोवा–कर्नाटकला जोडतो. निसर्ग, पर्वत, नद्या, जंगल यांच्या मध्येून जाणारा हा प्रवास म्हणजे डोळ्यांना आणि मनाला पर्वणीच.
कोकण रेल्वे हा फक्त प्रोजेक्ट नाही—तो भारताच्या जिद्दीचा आणि कोकणवासीयांच्या स्वप्नांचा विजय आहे.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






