सोलापूर शहरात सिटी बससेवा सुरू करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी
महापालिका आयुक्तांच्या जनता दरबारात निवेदन
सोलापूर (प्रतिनिधी) – सोलापूर शहरातील बंद पडलेल्या सिटी बससेवा तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडतर्फे आज सोलापूर महापालिका आयुक्तांच्या जनता दरबारात निवेदन सादर करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून शहरातील अनेक मार्गांवर सिटी बसेस बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा निवेदनात मांडण्यात आला.
सोलापूर हे यंत्रमाग कामगारांचे शहर असून एमआयडीसी परिसरात काम करणाऱ्या रोजंदारी मजूरांची संख्या मोठी आहे. सिटी बस सेवा बंद असल्याने या कामगार, तसेच हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण व नातेवाईक, ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी, शहरातील शाळा–कॉलेजची मुले, दुचाकी–चारचाकी नसलेले नागरिक यांना रिक्षा हे एकमेव साधन उपलब्ध राहिले आहे. रिक्षाचा भाडेखोर दर, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, गर्दीमुळे होणारा धोका आणि भांडणांची समस्या यामुळे नागरिक त्रस्त झाल्याचे संभाजी ब्रिगेडने नमूद केले.
महागाई, पेट्रोल–डिझेल दरवाढ आणि रोजगाराची कमतरता यांच्या पार्श्वभूमीवर सिटी बस ही सर्वसामान्यांसाठी मोठी जीवनदायिनी सेवा असून ती बंद राहिल्याने नागरिकांचे आर्थिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे हाल वाढल्याचे निवेदनात सांगण्यात आले. त्यामुळे शहरातील ज्या मार्गांवर सिटी बसेस बंद आहेत, त्या मार्गांवर तत्काळ बससेवा सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली.
या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, महानगर प्रमुख शिरीष जगदाळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनल दास, ॲड. गणेश विलास कदम (जिल्हाध्यक्ष – वकील आघाडी), महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष जयश्री जाधव, शहराध्यक्ष मनीषा कोळी, जिल्हा सचिव संजीवनी सलबत्ते, जिल्हा उपाध्यक्ष सुनिता घंटे, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, उद्योग आघाडी शहराध्यक्ष संतोष सुरवसे, शहर व जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे, शहर कार्याध्यक्ष सतीश वावरे, सुनंदा सूर्यवंशी, सुनिता कारंडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






