हत्तुर ता. दक्षिण सोलापूर येथे मारुती निरवणे यांचे घर संपूर्णपणे जळून खाक झाल्याची हृदयद्रावक माहिती गावातील श्रींकात भरले व काही प्रतिष्ठित व्यक्ती यांनी मला फोनवरून दिली. ही बातमी समजताच क्षणाचाही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. निरवणे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले, धीर दिला व घडलेल्या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली.
कष्टाची पराकाष्ठा करून उभारलेला संसार, घरातील सोनं-नाणं, जमा केलेला पैसा आणि आयुष्यभराची स्वप्नं… डोळ्यासमोर काही क्षणात जळून खाक होताना पाहताना कोणाच्याही डोळ्यातून अश्रू ओघळले नाहीत तरच नवल.
एवढ्या दिवसांचा थाटलेला घर-संसार क्षणात राखरांगोळी होतो, त्या असह्य वेदना मारुती निरवणे यांचे चिरंजीव यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या शब्दांतून आणि डोळ्यांतून प्रकर्षाने जाणवत होत्या.
या भीषण घटनेत हत्तुरच्या ग्रामदैवतेची कृपा म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही, याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच घटनेची तात्काळ माहिती मला फोन करून दिल्याबद्दल ग्रामस्थांचे विशेष आभार मानतो.
या कठीण प्रसंगी निरवणे कुटुंबीय एकटे नाहीत, हे ठामपणे सांगत येत्या काळातही फाउंडेशन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असा विश्वास देत त्यांच्या मानसिक मनोबलाला आधार देण्याचा प्रयत्न केला.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






