*सोलापूर विकास मंचतर्फे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांचा सत्कार; शहर विकासाच्या प्रमुख मुद्द्यांवर निवेदन सादर*
_पुरस्थितीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल आयुक्तांचा गौरव; ५४ मीटर रस्ता, सर्व्हिस रोड, नाईट लँडिंग व शहर बससेवेच्या तातडीच्या गरजांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले_
सोलापूर महापालिकेच्या वतीने शहरातील अनेक महत्त्वपूर्ण विकासकामांना गती देऊन ती मार्गी लावल्याबद्दल सोलापूर विकास मंचतर्फे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांचा सर्व सोलापूरकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला. मृत पाळीव प्राणी व जनावरांची विद्युतदाहिनी, ५४ मीटर रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी घेतलेली पुढाकार, अॅडवेंचर पार्कचे उद्घाटन, रंगभवन चौकातील LED सिस्टमची दुरुस्ती व पुनर्रचना यांसह अनेक कामांची प्रभावी अंमलबजावणी महापालिकेने केली आहे.
सप्टेंबर महिन्यात सोलापूर शहर व जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. त्या काळात आयुक्त डॉ. ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने केलेल्या अहोरात्र कार्याबद्दल विकास मंचाने मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी सोलापूर शहरातील काही तातडीच्या समस्या आणि विकासाशी संबंधित मुद्द्यांवर निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रमुख मुद्दे असे:
१. ५४ मीटर रस्ता (CNS हॉस्पिटल ते सोरेगाव) तातडीने पूर्ण करणे.
२. विजापूर रोड सर्व्हिस रोड खुला ठेवून वाहतुकीस सुलभता निर्माण करणे; बुधवार पेठ–जामबुत निवारा गृह परिसरातील रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती देण्यात आली.
३. पत्रकार भवन रेल्वे उड्डाणपूलाचे रुंदीकरण तातडीने मंजूर करून सुरू करण्याची मागणी.
४. सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा त्वरीत सुरू करण्याची आवश्यकता.
५. सोलापूर शहरात सिटी बस सेवा तातडीने सुरू करणे.
६. जनावरांची विद्युतदाहिनी उभारणी लवकर पूर्ण करण्याची विनंती.
७. सोरेगाव मार्गावरील रस्त्यांची खराब अवस्था आणि आदिवासी परिसरातील ‘अंमली पदार्थ मुक्त सोलापूर’ उपक्रमाच्या कामांना तातडीने मंजुरी देण्याची मागणी.
या सर्व मुद्द्यांवर त्वरित उपाययोजना करून शहराच्या विकासाला गती देण्याची अपेक्षा विकास मंचाने व्यक्त केली.
ह्यावेळी केतन शहा, योगिन गुर्जर, मनोज क्षिरसागर, अॅड. दत्तात्रय अंबुरे, प्रसन्न नाझरे आणि विजय कुंदन जाधव आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






