मोहोळ नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती : माजी आमदार राम सातपुते यांचे मार्गदर्शन
मोहोळ (जि. सोलापूर)
सोलापूर पूर्व जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरु केली असून, माजी आमदार राम सातपुते यांनी आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या वेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी निवडणुकीचे नियोजन, संघटनात्मक रणनीती तसेच स्थानिक विकासाच्या दृष्टीकोनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी बोलताना माजी आमदार राम सातपुते म्हणाले की, “स्थानिक पातळीवर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यक्षम, प्रामाणिक आणि विकासाभिमुख नेतृत्व आवश्यक आहे. पक्षाच्या तत्त्वांवर, जनसेवेच्या भावनेवर आणि लोकविश्वासावर आधारित उमेदवारांची निवड विजय निश्चित करेल.”
बैठकीदरम्यान पक्ष संघटन मजबूत करण्यावर तसेच मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर देण्यात आला. मोहोळ नगरपरिषदेतील विविध प्रभागांमध्ये जनतेच्या मूलभूत गरजांशी निगडित विषयांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
या वेळी सोलापूर पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व जागांवर भाजप बहुमताने विजयी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, मोहोळ उत्तर मंडलाध्यक्ष सतीश काळे, दक्षिण मंडलाध्यक्ष रमेश माने, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चवरे, पिंटू राऊत, सुशील क्षीरसागर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






