*भावसार व्हिजन सोलापूर क्लब च्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त भावसार व्हिजन सेवा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न*
*समाजातील ज्येष्ठांचा सन्मान हा खऱ्या अर्थाने समाजाचा सन्मान – सौ. रोहिणी तडवळकर यांचे प्रतिपादन*
—————————————————-
*सोलापूर : भावसार व्हिजन सोलापूर क्लब च्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त “भावसार व्हिजन सेवा पुरस्कार प्रदान सोहळा” बुधवार दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ७.०० वा. डफरीन चौक येथील दमाणी ब्लड बँक च्या हॉलमध्ये पार पडला. यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर शहर अध्यक्षा सौ. रोहिणीताई तडवळकर, भावसार व्हिजन इंडिया एरिया १०५ चे गव्हर्नर श्री. श्रीकांत रंगदळ, नॅशनल डायरेक्टर श्री. शिवाजी उपरे, माजी गव्हर्नर श्री गिरीश पुकाळे, अध्यक्ष श्री. विशाल खमितकर, सचिव श्री. आशिष जवळकर आदी उपस्थित होते.*
*सर्वप्रथम अध्यक्ष विशाल खमितकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले व सचिव आशिष जवळकर यांनी सचिव अहवाल सादर केला.*
*तद्नंतर प्रमुख पाहुणे सौ. रोहिणीताई तडवळकर, श्री. श्रीकांत रंगदळ यांच्या शुभहस्ते प्रदीर्घ व उत्कृष्ट कार्य केलेले आजचे सत्कारमूर्ती श्री. दत्तात्रय धोंडीबा हिबारे, श्री. ज्ञानोबा निवृत्तीनाथ महिंद्रकर, श्री. सुहास कटारे यांना “भावसार व्हिजन सेवा पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सत्कार मूर्तीची ओळख हर्षल माळवदकर, धवल चिंचुरे, दीपक महिंद्रकर यांनी करून दिले. तर प्रमुख पाहुण्यांची ओळख गिरीश पुकाळे यांनी करून दिली. सत्काराला उत्तर देताना तिन्ही सत्कारमूर्तींनी त्यांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. शालेय जीवनात शिक्षकांनी व सामाजिक जीवनात समाजाने कौतुकाची थाप दिली तर केलेल्या श्रमाचे फळ मिळते असे नमूद केले.*
*तद्नंतर माजी डेप्युटी गव्हर्नर श्री संतोष पुकाळे यांनी भावसार व्हिजन बद्दल थोडक्यात माहिती सांगितली.*
*श्रीकांत रंगदळ म्हणाले की, नुकताच प्ले स्टोअरवर भावसार उद्योग नवीन ॲप लॉन्च करण्यात आलेला आहे. त्यामध्ये आपल्या समाजातील जास्तीत जास्त समाज उद्योजकांनी नोंदणी करून सहकार्य करावे. येत्या वार्षिक अधिवेशनामध्ये या ॲपचे उद्घाटन करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.*
*प्रमुख पाहुण्या सौ. रोहिणीताई तडवळकर म्हणाल्या की समाजातील जेष्ठांचा सन्मान हा खऱ्या अर्थाने समाजाचा सन्मान असतो. समाज बंधू-भगिनींना यामुळे ऊर्जा व प्रेरणा मिळते. भविष्यात मुलींच्या शिक्षणासाठी व तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी शासकीय स्तरावर होत असलेल्या प्रयत्नांमध्ये क्लब ने सहभाग घ्यावा. व शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील विविध घटकांना मिळवून द्यावा यासाठी ही क्लबने प्रयत्न करावेत.*
*भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी श्री. विजय महिंद्रकर यांची निवड झाल्याबद्दल अध्यक्ष विशाल खमितकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.*
*यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते “झेप” या क्लब बुलेटिन चे प्रकाशन करण्यात आले. या बुलेटिनसाठी सहकार्य केल्याबद्दल श्री. प्रशांत तांदळे यांचा अध्यक्षांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.*
*क्लब चा 19 वा वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला. त्यानंतर अध्यक्ष विशाल खमितकर यांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुहास राशिनकर यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन सचिव आशिष जवळकर यांनी मानले.*
दक्षता उपसंपादक : राजन क्षत्रिय






