₹५ लाखांची मदत – आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपये सुपूर्द
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील महागाव येथील रहिवासी आणि सध्या झारखंड राज्यात सेवेत असलेले आयएएस अधिकारी श्री. रमेश घोलप यांनी अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतःच्या तीन महिन्यांच्या पगारातून एकूण पाच लाख रुपये मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
*आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना थेट मदतीचा हात*
या निर्णयाअंतर्गत त्यांनी प्रथम टप्प्यात बार्शी तालुक्यातील कारी गावातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि दहीटणे गावातील एका शेतकरी कुटुंबातील मुलगा–मुलीच्या शैक्षणिक सहाय्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये मदत केली. श्री. रमेश घोलप आणि त्यांच्या पत्नी रुपाली घोलप यांनी हे धनादेश स्वतः जाऊन संबंधित कुटुंबांना सुपूर्द केले.
*शिक्षणासाठी फिक्स डिपॉझिट – ‘पोलिस होण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं’*
कारी गावातील शेतकऱ्याची मुलगी आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलीस सेवेत जाण्याचा निश्चय केला आहे. तिच्या या प्रयत्नात कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी दिलेली मदत फिक्स डिपॉझिट स्वरूपात तिच्या नावावर जमा करण्यात आली असून पुढील शिक्षणासाठी त्याचा उपयोग होणार आहे.
*३० शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत अतिरिक्त मदत*
बार्शी तालुक्यातील आणखी ३० शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा-दहा हजार रुपये देण्याचा निर्णय रमेश घोलप यांनी घेतला असून ही मदत ते स्वतः दिवाळीच्या काळात वितरित करणार आहेत.
*अतिवृष्टीमुळे गंभीर झालेले शेतकऱ्यांचे हाल*
महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडले आहेत. अनेकांची घरे, शेतजमिनी आणि पिके पूर्णपणे नष्ट झाली असून काही शेतकऱ्यांना आत्महत्येचा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. या परिस्थितीत समाजातील संवेदनशील घटकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं ही काळाची गरज असल्याचं श्री. घोलप यांनी नमूद केलं.
*समाजातील इतर घटकांना आवाहन*
“ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांच्या दु:खाच्या प्रसंगी प्रत्येकाने आपापली सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे. फक्त आर्थिक नाही तर भावनिक आधार देणेही तितकेच महत्त्वाचे आहे,” असे मत व्यक्त करून श्री. घोलप यांनी विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या लोकांना पुढे येण्याचे आवाहन केले.
*संघर्षातून उभा राहिलेला संवेदनशील अधिकारी – लोकाभिमुख कार्यपद्धती*
गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन आयएएस अधिकारी बनलेले रमेश घोलप यांचा प्रवास स्वतः संघर्षमय राहिला आहे. सध्या ते झारखंड राज्याच्या पेयजल व स्वच्छता विभागाचे विशेष सचिव आणि जल जीवन मिशनचे मिशन डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. झारखंडमध्ये सेवेत असताना त्यांनी मानवी संवेदनशीलतेने अनेक उपक्रम राबवले आहेत. सामाजिक बांधिलकी, गरजूंप्रती सहानुभूती आणि थेट लोकांमध्ये जाऊन कार्य करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे झारखंडमधील स्थानिक जनतेत ‘गरीबांचा कलेक्टर’ म्हणून त्यांची ओळख आहे.




