spot_img
spot_img
spot_img
spot_img

सिद्धनाथ दर्शनावरून परतताना काळाचा घाला; विहिरीत पिकअप कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

सिद्धनाथ दर्शनावरून परतताना काळाचा घाला; विहिरीत पिकअप कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

 

आम्ही सोलापूरकर न्यूज ( Shivaji Sawant )

सोलापूर माळशिरस, प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरून गेला. म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत भाविकांना घेऊन जाणारी पिकअप गाडी कोसळल्याने १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रांजणी येथील भाविक सिद्धनाथ महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून सर्वजण पिकअप वाहनातून गावाकडे परतत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल विहिरीजवळ वाहन गेल्यानंतर पिकअप थेट विहिरीत कोसळली. अपघात इतका अचानक घडला की वाहनातील प्रवाशांना स्वतःचा बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.

 

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस, महसूल विभाग, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतील पाण्याची पातळी अधिक असल्याने बचावकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. मात्र स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचाव पथकांनी विहिरीत उतरून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्याचे काम हाती घेतले.

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले सर्वजण एकाच परिसरातील असल्याने रांजणी गावात शोकाचे वातावरण पसरले आहे. अनेक कुटुंबांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमावल्याने गावात दुःखाचे सावट निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. अनेकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

 

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू केले असून जखमींवर उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू असून वाहनाचा वेग, रस्त्याची परिस्थिती आणि तांत्रिक बिघाड या सर्व बाबींची चौकशी केली जात आहे.

या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा हळहळला असून विविध राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी मृत भाविकांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. प्रशासनाकडून मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!